इमारत | प्रतिकात्मक फोटो |(Photo credit : commons.wikimedia)

राज्य सरकारच्या माथाडी बोर्ड्सच्या माध्यमातून माथाडी कामगारांना (Mathadi Workers) सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत घरे मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठवड्यात माथाडी प्रतिनिधी आणि सिडको (CIDCO) प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता ते खुल्या प्रवर्गात अर्ज करणार नाहीत. माथाडी कामगारांसाठी एमएमआर प्रदेशात सुमारे 30,000 ते 40,000 घरे उपलब्ध करून दिली जातील, असा दावा एका ज्येष्ठ माथाडी नेत्याने केला.

याआधी नियोजन संस्थेने प्रजासत्ताक दिनी तळोजा नोडमध्ये 5,730 घरांची गृहनिर्माण योजना सुरू केली आणि सध्या त्याची नोंदणी सुरू आहे. दोन आठवड्यांत सिडकोकडे 10,000 हून अधिक अर्ज आले आहेत. सिडकोने आपल्या मेगा हाउसिंग योजनेद्वारे नवी मुंबईत 90,000 घरे उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे जी पंतप्रधान आवास योजनेचा (PMAY) भाग असेल. एकूण 90,000 घरांपैकी 53,000 घरे EWS अंतर्गत आणि 47,000 LIG श्रेणीअंतर्गत बांधली जातील.

सध्या वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा, उलवे, घणसोली येथे 5 हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. आमदार शशिकांत शिंदे जवळपास सहा महिन्यांपासून नियोजन संस्थेकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, त्यांनी याबाबत अनेक बैठकाही घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात सिडको प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत माथाडी मंडळांमार्फत माथाडी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी माथाडी कामगार मंडळामार्फत अर्ज करतील आणि उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आल्यास, लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप केले जाईल, शिंदे यंनी ही माहिती दिली. येत्या 10 दिवसांत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Nagpur To Mumbai Bullet Train: नागपुरातुन मुंबईत 3.5 तासात पोहोचणार, 350 किमी वेगाने धावणार बुलेट ट्रेन, जाणून घ्या सर्वकाही)

दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीदिनी 23 मार्च रोजी माथाडी कामगारांसाठी घरकुल योजना सुरू होण्याची शक्यता माथाडी युनियनच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून हजारो माथाडी कामगार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. यापूर्वी सिडकोने त्यांच्यासाठी नवी मुंबईत घरे उपलब्ध करून दिली होती. आता माथाडी मंडळांच्या माध्यमातून माथाडी कामगारांना घरे मिळणार आहेत.