
विवाहित महिलांसाठी मकर संक्रात हा सण अत्यंत उत्सवाचा सण असतो. येत्या बुधवारी म्हणजेच 10 जानेवारीला हा सण संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे. परंतु, या सणापूर्वीचं बीड जिल्ह्यात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संक्रांतीसाठी सासरच्या लोकांनी माहेरी न पाठवल्याच्या रागातून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा विकास बिक्कड (वय, 25) असं या मृत नवविवाहितेचं नाव आहे. पूजाचा 8 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. परंतु, रविवारी पहाटे पूजाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
मागील वर्षातील एप्रिल महिन्यात पूजाचा विकाससोबत विवाह झाला होता. येणारी संक्रात ही पूजाची पहिली संक्रात असल्याने तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवावे, अशी तिची इच्छा होती. याबाबत पूजाने सारसच्या मंडळींना सांगितलेही होते. परंतु, पूजाने पहिली संक्रांत सासरीचं साजरी करावी, असा तिच्या सासरच्यांचा आग्रह होता. त्यामुळे पूजा नाराज होती. (हेही वाचा - मुंबई: बाथरुममध्ये जीव गुदमरून एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू)
या नाराजीतून पूजाने रविवारी पहाटे गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, मीना तुपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूजाच्या आत्महत्येमुळे धानोरा गावात एकच खळबळ उडाली आहे.