बीड: भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर संचारबंदीच्या नियमांचे पालन उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
BJP MLA Ramesh Karad (PC - Facebook)

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार रमेश कराड (BJP Vidhan Parishad MLA Ramesh Karad) यांच्या विरोधात संचारबंदीच्या नियमांचे पालन उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश कराड यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रमेश कराड यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन न करता जमाव करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे या प्रकरणी रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी कराड यांच्यासोबत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड आणि इतर 15 जण उपस्थित होते. भाजपने पंकजा मुंडे यांना नाकारून रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. भाजपने अचानक विधानपरिषदेचा उमेदवार बदलला होता. अगोदर डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपने त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगून पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली. (हेही वाचा - पुणे स्मार्ट सिटी वॉर रुमला अजित पवार यांची भेट; म्हणाले, कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही)

रमेश कराड यांनी 2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. परंतु, कराड यांनी अचानक माघार घेऊन भाजप नेते सुरेश धस यांना पाठिंबा दर्शवला होता. सध्या राज्यात कोरोना विषाणुचे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. परंतु, लॉकडाऊन काळात नागरिकांकडून तसेच अनेक दिग्गज व्यक्तींकडून संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. ़