BEST Bus (Photo Credits: X/@ANI)

New Year 2025 Celebrations in Mumbai: मंगळवार, दिनांक 31 डिसेंबर 2024 च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी' गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गांवर रात्री एकूण 25 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

तसेच नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमातर्फे दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक तसेचे प्रेक्षणिय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकुलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडविण्याच्या हेतूने, हेरिटेज टूर चालविण्यात येणार आहेत.

New Year 2025 Celebrations in Mumbai:

मार्ग-

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम)- गेट वे ऑफ इंडिया- मंत्रालय- एनसीपीए- नरिमन पॉईंट- विल्सन कॉलेज- नटराज हॉटेल- चर्चगेट- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हुतात्मा चौक- रिझर्व बँक- ओल्ड कस्टम हाऊस- म्युझियम.

वेळा-

वरील मार्गांवर सकाळी 10 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत प्रत्येकी 45 मिनिटांच्या प्रस्थानानंतर सदर बसगाड्या प्रवर्तित करण्यात येती

शुल्क-

सदर हेरिटेज टूरसाठी वरच्या मजल्यासाठी प्रत्येकी रु. 1500/- व खालच्या मजल्यावर प्रत्येकी 75/- तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी 'नववर्ष स्वागता' च्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या या दोन्हीही अतिरीक्त बससेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. (हेही वाचा: Guidelines For New Year Celebrations In Mumbai: मुंबईकरांनो लक्ष द्या! पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध जारी)

दरम्यान, नववर्षाच्या स्वागतावेळी मुंबईत पब, बार आणि रेस्टॉरंट्स नवीन वर्षाच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यावेळी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांकडून व्यापक सुरक्षा योजना राबविण्यात आली आहे. आठ अतिरिक्त आयुक्त, 29 उपायुक्त, 53 सहायक आयुक्त, 2,184 पोलीस अधिकारी आणि वाहतूक कर्मचाऱ्यांसह 12,048 कर्मचारी तैनात करणार आहेत.