मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये नवीन नळ, टॉयलेट फिटिंगच्या सामानाची चोरी; मध्य रेल्वेला लाखोंचा फटका
Deccan Queen (Photo Credits: indiarailinfo.com)

रेल्वे प्रवाशांसाठी सरकारने अनेक उत्तम सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी रेल्वे अपग्रेड करून नवे साहित्य बसवण्यात आले. मात्र सुंभ जळला तरी पीळ जात नाही या वृत्तीनुसार प्रवाशांनी या सुविधांचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. तेजस एक्स्प्रेसमधील हेडफोन चोरीला जाण्याच्या प्रकारानंतर आता डेक्कन क्वीनमधीलही (Deccan Queen Express) साहित्य चोरीला गेले आहे. मुंबई-पुणे डेक्कन एक्प्रेसमधील महागडे नळ तसेच बाथरूम फिटिंगबाबतचे महागडे सामान चोरीला गेले आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी मार्च 2019 ते आतापर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे.

मध्य रेल्वेने प्रोजेक्ट 'उत्कृष्ट'अंतर्गत डेक्कन एक्स्प्रेस व गदग एक्स्प्रेस अपग्रेड केले होते. यासाठी प्रत्येकी तब्बल 60 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रवाशांनी या दोन्ही गाड्यात हैदोस घातला व चक्क 169 टॉयलेट फिटिंगचे साहित्य, महागड्या नळांची चोरी केली. रेल्वे अपग्रेड करताना जग्वार, हिंदवेअर आणि सेरासारख्या कंपन्यांचे महागडे नळ बसविण्यात आले होते, मात्र आता हे समान चोरीला गेल्याने रेल्वेला फार मोठा फटका बसला आहे. डेक्कन एक्स्प्रेसमधील 99 फिटिंग, तर गदग एक्स्प्रेसमधील 70 फिटिंग चोरीला गेले आहेत. (हेही वाचा: डेक्कन क्वीनला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, लवकरच जोडले जाणार एलएचबी डब्बे)

या वस्तूंची झाली चोरी -

  • डेक्कन एक्स्प्रेस - फ्लशर वॉल्व्ह- 20, पाण्याचे नळ- 51, हॅण्ड पंप- 28
  • गदग एक्स्प्रेस - फ्लशर वॉल्व्ह – 27, पाण्याचे नळ– 27, हॅण्ड पंप– 16

दरम्यान, रेल्वे आपल्या ‘उत्कृष्ट’ योजने अंतर्गत 24 गाड्यांना अपग्रेड करणार आहे. यामध्ये डब्यांचे रंगकाम, प्रसाधनगृहात अधिक स्वच्छता, लाद्या, टॉयलेटचे भांडे, आधुनिक फ्लश यंत्रणा आणि नवीन नळ यांचा समावेश आहे.