डेक्कन क्वीनला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, लवकरच जोडले जाणार एलएचबी डब्बे
मध्य रेल्वे डेक्कन क्विन Photo credits: PIB

'दख्खनची राणी' म्हणून रेल्वेप्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेल्या डेक्कन क्वीन (Deccan Queen) रेल्वेचा आता चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, 90 वर्षाची या डेक्कन क्वीनला लिंके हाफमन बुश (LHB) प्रकारातील डब्बे जोडण्यात येणार आहे. इतकच नव्हे तर सध्या डायनिंग कारची सुविधा देणा-या या रेल्वेमध्ये नव्या रुपातील डायनिंग कारही जोडली जाणार आहे. येत्या 1-2 महिन्यात ही आधुनिक सोयीसुविधा असलेली डेक्कन क्वीन प्रवाशांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय.

मुंबई-पुणे (Mumbai-Pune) प्रवासादरम्यान डेक्कन क्वीनला प्रवाशांची विशेष पसंती असते. ही देशातील एकमेव अशी गाडी आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा देण्यात आली आहे. आता ह्यात थोडा बदल करुन आधुनिक सोयी सुवधा असलेली नवीन डायनिंग कार सुरु करण्यात येणार आहे. त्याशिवाय या गाडीला एलएचबी डब्बे दिल्याने दोन्ही बाजूला इंजिन मिळाल्याने घाटातील वेळ वाचणार आहे. हेही वाचा- डेक्कन क्विन एक्स्प्रेस होणार अधिक सुसाट; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 30-35 मिनिटांनी कमी होणार

त्याशिवाय या गाडीचा वेगही वाढेल. तसेच या गाडीला पुलपुश तंत्रज्ञानाचा देखील फायदा होणार आहे. या गाडीच्या डब्ब्यांच्या रंगामुळे या रेल्वेला विशेष ओळख आहे, त्यामुळे हा रंग न बदलता या रेल्वेमध्ये हे आधुनिक बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सध्या पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सहा गाड्यांपैकी केवळ इंटरसिटी गाडीला एलएचबी कोच असून दोन महिन्यांपासून पुल-पुश तंत्रज्ञानाची चाचणीही घेतली जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.