राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सातारा (Satara) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या टीकेवरून खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. ज्यांचे डिपॉझिट त्यांच्याच पक्षाने इतक्यांदा जप्त केले आहे त्यांच्या विधानाची दखल तरी का घ्यावी असे म्हणत शरद पवार यांनी पडळकर यांना टोलावले आहे. याशिवाय शरद पवार यांनी इंधन दरवाढ (Petrol- Diesel Rates), भारत चीन संघर्ष (India- China Disputes), महाराष्ट्रात डिजिटल शिक्षणाची (Maharashtra Online Education) सुरुवात या बाबत सुद्धा भाष्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे फडणवीस, भाजप यांची 'मन की बात' तर नाही ना? शिवसेनेचा सवाल
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर हल्लाबोल करत, ते तर महाराष्ट्रातले कोरोना व्हायरस आहेत अशा आशयाची कटू टीका केली होती. यानंतर पडळकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते. बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी या विधानाच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय दंड संहिता कलम 505(2) अन्वये बारामती पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले विधान ही त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. पक्षाशी त्याचा कोणताही संबंध नाही. शरद पवार आमचे राजकीय विरोधक आहेत. ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे पवार यांच्याबद्दल कोणीही अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे आहे, असे म्हणत भाजप ने सुद्धा पडळकर यांच्या विधानाची जबाबदारी नाकारली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका करत पडळकर यांना काहीसा आधार दर्शवला होता मात्र तिन्हीही शरद पवार यांच्या विरुद्धच्या विधानावर समर्थन दर्शविलेले नाही.