गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे फडणवीस, भाजप यांची 'मन की बात' तर नाही ना? शिवसेनेचा सवाल
Gopichand Padalkar| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे काही राजकारण किंवा समाजकारणातील महान व्यक्तिमत्व नाही. पण देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी धनगर समाजातील एक थापाड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य कले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची 'मन की बात' (Mann Ki Baat) तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयातून भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला चढविण्यात आला आहे.

'गोपीचंद करामती! भाजपला जोडे', या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात अत्यंत शेलक्या शब्दांत भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली आहे. गोपीचंद जासूस नावाचा हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. या गोपीचंदाच्या अनेक करामती पडद्यावर दिसल्या. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून या गोपीचंदांच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना आमदार केले त्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर फार घाणेरड्या शब्दांत भडास व्यक्त केली आहे. व त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. भाजपचे गोपीचंद हे कारी राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्व नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक थापाड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची 'मन की बात' तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेलेला कोरोना आहे, अशा गुळण्या गोपीचंदने टाकल्या. पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केले असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले, असे गोपीचंद महाशय म्हणतात. पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजन नाही आणि अजेंडा नाही, असे मनाचे श्लोक गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही विधाने पवारांवर केली ती भाजपच्या काही नेत्यांनी अधुनमधून केलीच आहेत. गोपीचंद पडळकर हे राजकारणातील कच्चे मडके आहे, हे माहीत होते पण कच्चे मडके फुटके देखील आहे हे आता सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत सामना संपादकीयातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. (हेही वाचा, गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; शरद पवार यांच्याबद्द वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण)

पडळकर यांच्यावर टीकास्त्र कायम ठेवताना सामनात पुढे म्हटले आहे की, पडळकर यांनी पवारांवर केलेली विधाने वादग्रस्त आहेत. पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरु असल्याचे मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. गोपीचंद हे भाजपच्या बिळात शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले. पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली. 'भाजपला मत देऊ नका. मी भाजपसाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला', असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपमध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपचे उमेदवार झाले. पण, बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वैगेरेबाबत गोंधळ आहे. (हेही वाचा, 'थोरातांची कमळा' गाजला मात्र 'विखे-पाटलांची कमळा' चित्रपट आला व पडला- शिवसेना)

पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता. 2014 मध्ये फडणवीस सरकार आलेच होते व धनगर आरक्षणाचा ठराव पहिल्याच कॅबिनेटमध्ये करु असे वचन भाजपनेच दिले होते. हे गोपीचंद कसे विसरले? असा सवालही सामना संपादकीयातून शिवसेनेने विचारला आहे.

शरद पवार यांनी तळागाळातील बहुजन समाजाला राजकारणात मनाचे पान दिले. त्यामुळे 60 ते 70 वर्षांत पवारांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवले अशी वाचाळकी करणे हे मूर्खपणाचे लक्षण तर आहेच. पण, मनाला कोरोना झाल्याचीही लक्षणे आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. पडळकर यांच्या विधानाशी भाजपचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपने आणला आहे. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तीशच टीका करणाऱ्यांपासून मात्र स्वत:ला झटकतात, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.