राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बारामती पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बारामती पोलीस (Baramati Police Station) ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनीही पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. भारतीय दंड संहिता कलम 505(2) अन्वये हा गुन्हा नोंदवीण्यात आला आहे.
'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' असे वादग्रस्त विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. पडळकर यांनी पंढरपूर येथे बोलताना हे विधान केले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन सुरु केले आहे. (हेही वाचा, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका)
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले विधान ही त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. पक्षाशी त्याचा कोणताही संबंध नाही. शरद पवार आमचे राजकीय विरोधक आहेत. ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे पवार यांच्याबद्दल कोणीही अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे आहे, असे म्हणत भाजपनेही पडळकर यांच्या विधानापासून हात झटकले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रभर आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी गोपीचंत पडळकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावला आहे. आटपाडी तालुक्यातील झरे परिसरात गोपीचंद पडळकर यांचे घर आहे. या घराबाहेर पोलीस कर्मचारी उभे आहेत. महाराष्ट्रातील विवध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलनही केले जात आहे.