Garba and Dandiya (Photo Credits: Facebook, PTI)

राज्यात कोणताही अंकुश किंवा निर्बंध न ठेवता गणपती उत्सव थाटामाटात साजरा झाला. आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे (Navratri 2022). या नवरात्रीच्या वेळी गरबा-दांडियाला (Garba-Dandiya) विशेष महत्व आहे. नवरात्रीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडियाला परवानगी द्यावी, असे मागणी शिंदे कॅम्पचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे.

उत्तर मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले सुर्वे म्हणाले की, 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. गुजरात, राजस्थान आणि इतर राज्ये मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडियाला परवानगी देतात. त्यामुळे महाराष्ट्रातही मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडिया खेळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ते म्हणाले, ‘शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर सर्व निर्बंध हटवले आहेत ज्यामुळे राज्यात जवळपास दोन वर्षांनंतर दहीहंडी आणि गणपती उत्सवाचा मार्ग मोकळा झाला आहे.’ मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन केले जात असून, त्यात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात, याकडे सुर्वे यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने नवरात्रीदरम्यान राज्यभर मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडियाला परवानगी देण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंपडलं गोमूत्र; बिडकीन येथील प्रकार, Watch)

दरम्यान, यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होत आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल आणि नवमी तिथी म्हणजे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरी केली जाईल. गुजरात आणि राजस्थानमध्ये नवरात्रात गरबा-दांडिया नृत्य केले जाते. दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे.