
देशभरासह महाराष्ट्रात नवरात्रौत्सवाचा सण उद्यापासून सुरु होणार आहे. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता मंदिरे अद्याप भाविकांसाठी सुरु करण्यात आलेली नाहीत. याच पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वपूर्ण अशा आई तुळजाभवानीच्या नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या पूजनेनंतर सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती आणि नवरात्रौत्सवाचा सण पाहता मंदिर प्रशासनासह पोलिसांकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मात्र मंदिर जरी बंद ठेवले असले तरीही ऑनलाईन पद्धतीने भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे.
राज्यात नवरात्रौत्सवाची मोठी धुम पहायला मिळते. तर अंबेमातेच्या मंदिरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. परंतु यंदा नवरात्रौत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने सण मोठ्या उत्साहात साजरा करता येणार नाही. तसेच मंदिरे ही बंद असल्याने भक्तांच्या उपस्थितीशिवाय देवीमातेची सर्व पूजा विधी पार पडणार आहे. तर तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रौत्सवादरम्यान फक्त पुजारी, मानकरी आणि सेवेकरी यांनाच प्रवेश दिला जाणार असून यांच्याच उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत.(Ghatasthapana 2020 HD Images: घटस्थापनेच्या निमित्ताने खास मराठी HD Greetings, Messages, Whatsapp Status, Wishes, Images शेअर करून सुरु करा नवरात्रीचा उत्सव)
कोरोनाच्या काळात भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर मंदिर बंद असल्याने त्यांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. हे दर्शन मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरुन पाहता येणार आहे. तर मंदिरात येणारे पुजारी किंवा मानकरी यांची कोरोनाच्या संदर्भात प्रथम चाचणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तर तुळजाभवानी मातेच्या नवरात्रौत्सवासाठी उद्यापासून ते 31 ऑक्टोंबर पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या काळात नागरिकांनी मंदिर प्रशासनासह पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन ही केले गेले आहे.