नवी मुंबई: सार्वजिक ठिकाणी थुंकल्यास नागरिकांना भरावा लागणार 250 रुपयांचा दंड
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. तर महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेल्या घाणीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तेथील कचरा उचलला जातो. परंतु काहीजण कचरा महापालिकेने दिलेल्या कचरा डब्याात न टाकता तेथेच रस्त्यावर फेकून देतात. त्याचसोबत नागरिक बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसून येतात. अशामुळे घाणीचे साम्राज्य वाढण्यास अधिक मदत होते. परंतु आता नवी मुंबईचे (Navi Mumbai) नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह घनकचरा विभागाने थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या पुढील आठवड्यापासून आता नवी मुंबई येथे रस्ते,पानपट्ट्या किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. सध्या ही प्राथमिक स्वरुपात कारवाई करण्यात येणार असल्यामुळे 250 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. परंतु भविष्यात दंडाची रक्कम वाढवण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे.(1 ऑगस्टपासून आता मुंबई रेल्वे पोलिसही ऑनड्युटी 'आठ तास', रेल्वे प्रशासनाचा महत्वपुर्ण निर्णय)

नवी मुंबई येथील काही ठिकाणी थुंकल्यामुळे तेथे घाणाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता लवकरच थुंकल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे. या दंडात्मक कारवाईमुळे नागरिकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.