Railway Police (Photo Credits: Facebook)

रेल्वे प्रवाशांसाठी अहोरात्र तैनात असणा-या मुंबई रेल्वे पोलिसांनाही (Railway Police)  आता केवळ 8 तास ड्युटी करावी लागणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आठ तासांच्या ड्युटी करावी अशी रेल्वे पोलिसांची मागणी होती. त्यामुळे त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू होईल. रेल्वे पोलिसांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. याआधी ही असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांची नीट अंमलबजावणी झाली नाही.

महाराष्ट्र टाईम्स च्या बातमीनुसार, 1 जानेवारी 2018 रोजी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांना आठ तास ड्युटी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुंबई रेल्वे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी वर्गानेही आठ तास ड्युटीची मागणी जोर धरू लागली होती. त्याचाच परिणाम म्हणून आता एक ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांनाही आठ तास ड्युटी असणार आहे.

हेही वाचा- घरातून पळून गेलेल्या 718 मुलांना पश्चिम रेल्वेने केले त्यांच्या कुटूंबियांकडे सुपूर्त

जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणा-या रेल्वे पोलिसांना वेळेची मर्यादा नसते. नेहमी दिलेल्या तासाच्या वरच त्यांना काम करावे लागते. ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. तर कित्येकदा पोलिसांनी मानसिक ताण-तणावालाही सामोरे जावे लागते. जनतेच्या रक्षणासाठी असलेले हे पोलीस आपल्या कुटूंबाला किंबहुना स्वत:ला हवा तितका वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीने विचार करता रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय खरच स्तुत्यप्रिय असा आहे.