Nashik: पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुपवर देवलाली येथील मिलिट्री कॅम्प चे फोटोज पाठवल्याप्रकरणी एका युवकाला अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील (Maharashtra) एका मिलिट्री कॅम्पचे (Military Camp) फोटोज पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला (Pakistan WhatsApp Group) पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक (Nashik) जवळील देवलाली (Deolali) येथील मिलिट्री कॅम्पचे फोटोज पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याप्रकरणी एका 21 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. या युवकाचे नाव संजीव कुमार (Sanjeev Kumar) असे असून तो बिहार (Bihar) मधील गोपालगंज (Gopalganj) येथील रहिवासी आहे. संजीव हा देवलाली जवळील एका कंस्ट्रक्शन साईटवर (Construction Site) काम करत होता. (जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान चा झेंडा फडकवणार्‍या तिघांंना अटक, एक हॅण्ड ग्रेनेड सुद्धा जप्त)

संजीवने पाकिस्तानशी निगडीत व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आर्मी कॅम्प हे कंस्ट्रक्शन साईटपासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे. संजीवला आर्मी कॅम्प जवळ येताना काही जवानांनी पाहिले होते. त्यानंतर तो आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर संजीवचा पाठलाग करुन जवानांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला देवलाली येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून चौकशी दरम्यान त्याने पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो शेअर केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्यावर खटला दाखल केला आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

नाशिक मधील देवलाली येथील मिलिट्री कॅम्पमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी, आर्टिलरी सेंटर आणि कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल सारख्या संरक्षण आस्थापने आहेत. या मिलिट्री कॅम्पच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे. (पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याने, भारतीय जवानाला अटक)

दरम्यान, भारतीय सैन्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक या माध्यमातून हनी ट्रॅपिंग केले जाते. यापूर्वी हनी ट्रपिंगच्या माध्यमातून लष्कराच्या जवानांचीही फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे Honey Trap हा गेल्या काही काळातील गंभीर मुद्दा बनला आहे.