Arrested (Photo Credits: Facebook)

नाशिक (Nashik) मधील एका एटीएममध्ये (ATM) 66 वर्षीय व्यक्तीची 31 हजार रुपयांना फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी नाशिक पोलिस अधिकाऱ्यांनी दोन जणांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या दोघांना धुळे पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. एका वृद्ध नागरिकाची फसवणूक करण्यात या दोघांचा सहभाग असल्याचा आढळल्यानंतर धुळे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. विजयकुमार पालाराम राजपूत (35 ) आणि सुनील धुपसिंग राजपूत (32) अशी या आरोपींची नावे असून हे दोघेही हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

29 सप्टेंबर रोजी 66 वर्षीय पीडित व्यक्ती नाशिकरोड मधील दुर्गा गार्डन येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. तेथे या दोन आरोपींनी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बाहणाने त्या व्यक्तीकडून कार्ड आणि त्याचा पिन नंबर घेतला. नंतर त्याच्या बँक खात्यातून 32,000 रुपये काढले, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे यांनी दिली.

त्यानंतर पीडित व्यक्तीने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, अशाच एका प्रकरणात दोघांना धुळे पोलिसांनी अटक केल्याचे एका अधिकाऱ्याला आढळून आले. धुळ्यातही अशी प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आरोपींना अटक केली. (Mumbai: कांदिवली येथे 55 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक; नोकरीचे आमिष दाखवत घातला 7 लाखांचा गंडा)

धुळे पोलीस ठाण्यातील कोठडी संपल्यानंतर या दोन्ही आरोपींना या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, उपनगर पोलिसांनी धुळे सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना पुन्हा अटक केली. त्यानंतर आरोपींना  न्यायालयात हजर केले असता दोघांनाही बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.