Sanjay Raut | (Photo Credit: Facebook)

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधा नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेबाबत पत्रकारांनी विचारले असता त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी काही विधाने केली. त्यावरुनच दाखल झालेल्या तक्रारीवरु पंचवटी (Panchvati Police Station) पोलिसांनी (Nashik Political News) गुन्हा दाखल केल्याचे समजते.

संजय राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीत तक्रारदाराने म्हटले आहे की, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करुन पद आणि पदावरील व्यक्तीच्या लौकीकास बाधा आणली आहे. ज्यामुळे त्यांची बदनामी झाली आहे, असा आरोप तक्रारकर्त्याने तक्रारी केला आहे. शिंदे गटातील शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Watch: 'भाजप म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही'- Uddhav Thackeray यांचा BJP वर निशाणा)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळाला. पुढे निवडणूक आयोगाने तर थेट निर्णय देत शिवसेना पक्ष आणि चिन्हच एकनाथ शिंदे यांना देऊन टाकले. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार फटका बसला आहे. राज्याच्या राजकारणात पाठिमागील 56 वर्षांमध्ये म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर प्रथमच ठाकरे यांना वगळून शिवसेना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी राजकारण कसे असेल याबातब प्रचंड उत्सुकता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. राजकारणात विजय-पराजय होत असतो. परंतू, जे विश्वासाने सोबत येतात आणि सत्तेसाठी विरोधकांचे तळवे चाटत असतात त्यांना सोडायचे नसते, अशा शब्दात अमित शाह यांनी हल्ला चढवला होता.