Firing (Photo Credits: Pixabay)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा शिवसेनेतील (Shiv Sena) वाद आता तळागाळात पोहोचला आहे. एका बाजूला निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशा कायदेशीर पातळीवर लढाई सुरु असतानाच या संघर्षाचा दुसरा अंक आता स्थानिक पातळीवरही पाहायला मिळतो आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात टोकाचा आणि निकराचा संघर्ष सुरु आहे. या संघर्षातूनच अनेकदा हिंसक कृतीही घडू लागल्या आहेत. नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील देवळाली येथे नुकताच याचा प्रत्यय आला. दोन्ही गटात झालेल्या राड्याचे पर्यावसन हवेत गोळीबार करण्यात झाले. हा गोळीबार शिंदे गटातील माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा स्वप्नील लवटे याने केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी स्वप्नील लवटे याला ताब्यातही घेतले आहे. नाशिकचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खंडवी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून,स्वप्नील लवटे याला ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गाव परिसरात बैठकीचे आयोजन गुरुवारी (19 जानेवारी) सायंकाळी करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष पदावरुन सुरु असलेल्या चर्चेत शिंदे ठाकरे गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात तुफान राडा सुरु झाला. या वेळी शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्निल लवटे याने आपल्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवत हानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. परंतू, या कृतीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. (हेही वाचा, Davos World Economic Forum: दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी 1 लाख 37 हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयीत स्वप्नील लवटे याला ताब्यात घेतले आहे. स्वप्नील हा नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या आहे. त्यामुळे नाशिकमधील वलय असलेल्या एका राजकीय कुटुंबातील व्यक्तीकडून गोळीबाराची कथीत घटना घडावी याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शासकीय शिवजयंतीसाठी अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत ही घटना घडली.

ठाकरे,शिंदे गटातील वादाची आणि संघर्षाची किनार लक्षात घेता नाशिक पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस पथके देवळालीकडे रवाना केली.