Nashik: नाशिक जिल्ह्यात खळबळ! मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या
MNS Flag (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) एका पदाधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (Satana) साक्री रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर आढळली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण काय? अद्याप याबाबत समजू शकले नसून याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

नंदू उर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय, 55) असे करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. नंदू हे मनसे पदाधिकारी होते. तसेच ते महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी देखील होते. दरम्यान, नंदू हे आपल्या गाडीने नाशिककडे चालले होते. मात्र, त्यांनी ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर येथे गाडी थांबवली. त्यानंतर आपल्या मावस भावाला फोन केला. त्यावेळी 'मी गाडी चालवण्याच्या मनस्थितीत नाही. मी सटाण्याजवळ असलेल्या जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे' असे नंदू यांनी आपल्या मावस भावास सांगितले. नंदू यांच्या फोननंतर त्यांच्या मावस भावासह इतर नातेवाईक तातडीने जोगेश्वरी फर्टीलायझर्सकडे आले. परंतु, त्यांना नंदू हे गाडीच्या समोरच्या सीटवर मृत अवस्थेत त्यांना दिसले. हे देखील वाचा- Ahmednagar Murder: अहमदनगरच्या राहुरी परिसरातील एका पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या

या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नंदू यांच्याजवळ पोलिसांना एक रिव्हॉल्व्हर सापडली. तसेच नंदू यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. नंदू शिंदे हे उद्योजक होते, त्यांनी अचानक उचलेल्या टोकाला पावलामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. या संदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.