
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या राहुरी (Rahuri) येथील एका साप्ताहिकाच पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर (Rohidas Datir) यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दातीर यांचे काल (6 एप्रिल) दुपारी अपहरण झाल्यानंतर रात्री उशिरा कॉलेजरोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली होती. यापैकी एखाद्याप्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा संशय स्थानिक पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
रोहिदास दातीर हे काल दुपारी दुचाकीवरून त्यांच्या घराकडे जात होते. मात्र, एका स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यातच अडवून त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी रोहिदास दातीर यांच्या पत्नीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास केला. तसेच आरोपी आणि गाडीचा तातडीने शोध सुरु केला. मात्र, रोहिदास यांचा त्याच रात्री कॉलेजरोड येथे मृतदेह आढळून आला आहे. टाईम्स ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या वृत्तानुसार, गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. हे देखील वाचा- मुंबई: बॉयफ्रेंड कडून बलात्कार झाल्याने तरूणीने मारली 6 व्या मजल्यावरून उडी; 20 वर्षीय मुलाला अटक
रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील 18 एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोडवरील एक हॉटेल इमारतीचा मुद्दा त्यांनी आपल्या लिखाणातून प्रशासनासमोर ठेवले आहेत. यापैकी काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे.