भाजप (BJP ) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकासआगाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत गंभीर आरोप केले आहेत. महाविकासआघाडी ( MVA Government) सरकारने प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार केला आहे. हा भ्रष्टाचार आपण पुराव्यासह बाहेर काढणार आहोत. ठाकरे सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार आहे. या सरकारने कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणसाठीच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत अशा तीव्र शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.
शिवसेना खासदार संजय राऊत हे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. त्यांच्या कारभारावर बोट ठेवतात मग त्यांनी या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारावरही बोलावं. औषधांसाठी काडलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. लसींसाठी काढलेले टेंडर रद्द का केले? हे राऊतांनी सांगितले पाहिजे, असे नारायण राणे या वेळी म्हणाले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक वेळी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जर केंद्राकडे बोट दाखवायचे तर मग केंद्रातच विलीन व्हावं ना. कोरोना संपवनं हे सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. उलट कोरोना हा सत्ताधाऱ्यांसाठी लाभकारी असल्याचेच राणे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर निलेश राणे यांची जोरदार टीका)
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावरुन टीका करताना नारायण राणे यांनी म्हटले हा मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा नव्हता. तर तो केवळ पिकनीक दौरा होता. कोरोना काळात नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. नागरिकांना ना लस मिळते आहे. ना व्हेंटीलेटर्स आहेत. नागरिकांसाठी काहीच नाही. केवळ जनाची नव्हे तर मनाचीही या सरकारला नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे नाहीत, अशा तीव्र शब्दात टीकाही राणे यांनी या वेळी केली.
दरम्यान, मराठा आरक्षण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच गेल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. उदय उच्च तंत्रव शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावरुनही राणे यांनी जोरदार टीका केली. आपलं पक्षात स्थान काय आहे ते पाहूनच गाठीभेटी घ्याव्यात असा सल्लाही राणे यांनी सामंत यांना या वेळी दिला.