नांदेड: गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; आठ वर्षांच्या मुलाने गमावला हात
Representation Image (Photo Credits: YouTube)

नांदेडमध्ये मोबाईलवर गेम खेळत असताना स्फोट झाल्याने एका 8 वर्षांच्या मुलाला आपला हात गमवाला लागला असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. नांदेड जिल्हातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात हा भयंकर प्रकार घडला. प्रशांत जाधव असे या पीडित मुलाचे नाव आहे. या प्रकारामुळे गावात मोबाईल वापराबाबत भीती पसरली आहे.

जिरगा गावात राहणाऱ्या श्रीपत जाधव या शेतकऱ्याने टीव्हीवर मोबाईलची जाहिरात पाहुन ऑनलाईन मोबाईलची मागणी केली. यात 1500 रुपयांना तीन मोबाईल आणि त्यावर एक घड्याळ मोफत देण्यात आले. आय कॉल के 72 (I KALL k72) कंपनीची ही जाहिरात होती. (मोबाईलचा स्फोट झाल्याने शेतकरी जखमी)

ऑर्डरवरुन आलेल्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल जाधव कुटुंबिय गेल्या एक ते दीड महिन्यांपासून वापरत होते. नेहमीप्रमाणेच त्यांचा मुलगा मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला आणि त्याच्या तळहात छिन्नविछिन्न झाला. इतकंच नाही तर मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटात घुसले. अचानक झालेल्या या आघातामुळे कुटुंबिय चिंतातूर झाले आहे.