Municipal Corporation By-Election Results 2020 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Municipal Corporation By-Election Results 2020: नांदेड (Nanded), अहमदनगर (Ahmednagar), परभणी (Parbhani) महापालिका पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020) पार पडली. या मतमोजणीत प्राप्त झालेल्या निकालानुसार नांदेड महापालिकेत काँग्रेस उमेदवार अब्दुल गफार यांचा 1866 मतांनी, बिलोली नगरपालिका प्रभाग क्र-5 पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार यशवंत लालजी गादगे 70 मतांनी तर, परभणी महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे शहनाजबी खान 1 हजार 338 मतांनी विजयी झाले आहेत. तर, अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार पल्लवी जाधव विजयी झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या पटनिवडणुकीतही काँग्रेसने आपला हात उंचावल्याचे तर, कमळ सुकल्याचे पाहायला मिळत आहे.

नांदेड महापालिका पोटनिवडणूक 2020

नांदेड महापालिका प्रभाग क्रमांक 13 ड (चौफाळा, मदिनानगर) पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी (6 फेब्रुवारी 2020) पार पडली. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेसाठी 24 मतदान केंद्रं उभारण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण 6 उमेदवार रिंगणात होते. नांदेड जिल्ह्यातीलच हिमायतनगर प्रभाग दोन, बिलोली प्रभाग पाच - अ, धर्माबाद प्रभाग - दोन व चार - अ, नायगाव प्रभाग - एक येथे नगरपंचायतींसाठई पोटनिवडणूक पार पडली.

अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक

अहमदनगर महापालिका प्रभाग 6 साठी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार पल्लवी जाधव विजयी झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह पाहायला मिळाला. या निवडणुकीसाठी महापालिका प्रभाग 6 हा अनुसूचित जमाती महिला राखीव होता. या ठिकाणी भाजप उमेदवार पल्लवी जाधव तर शिवसेना उमेदवार अनिता दळवी यांच्यात थेट निवडणूक झाली.