
दुचाकी पार्किंगच्या वादातून शेजारच्या महिलेची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील नंदनवन येथे बुधवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्थानिक पोलीसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणांवरून या दोघात वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या आरोपीने संबंधित महिलेची चाकू भोसकून हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
बंडु उर्फ एकनाथ प्रेमराज टापरे असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन झोपडपट्टीत राहणारा आहे. बुधवारी रात्री 9. 30 वाजताच्या सुमारास गल्ली नंबर 5 मध्ये राहाणाऱ्या आरती नितीन गिरडकर त्यांची दुचाकी घराजवळ पार्क करीत होत्या. त्यावेळी बंडुने आरती यांच्यावर आक्षेप घेत शिवीगाळ सुरु केली. दरम्यान, आरती यांनी जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. या वादातून आरोपी बंडूने आरती यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. हे देखील वाचा- पुणे: मैत्रिणीला भेटायला गेला, बायको-मुलांनी घरी नेऊन बदडला; नवऱ्याची पोलिसात फिर्याद, पिंपरी चिंचवड येथील घटना
या घटनेमुळे परिसरात मोठा थरार निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा पोहचला. मयताच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.