आज महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनामध्ये दुसर्या दिवशी विरोधकांचा गोंधळ कायम होता. दरम्यान आज दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र या सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Nagpur Winter Session 2019: शेतकर्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; विधीमंडळाचं काम दिवसभरासाठी तहकूब
महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सध्या विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'सावरकर'च्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये चर्चा रंगली होती. आता आज दुसर्या दिवशी शेतकर्यांचे प्रश्न, ओला दुष्काळ आणि विदर्भाच्या प्रश्नावरून पुन्हा वातावरण तपण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विधिमंडळाचे काम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे.
नागपूरमध्ये सुरू यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर असे असेल. आज राष्ट्रवादी अध्यअक्ष शरद पवार देखील नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी ते नागपूरात नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.
भाजपा आमदारांनी पहिल्याच दिवशी थेट सभागृहात बॅनरबाजी केली. मात्र ही बॅनरबाजी आता भाजप आमदारांना भोवण्याची शक्यता आहे. सभागृहात अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यास परवानगी नसते. असं असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात बॅनर झळकावल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.