Nagpur Congress News: नागपूर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत खुर्च्या फेकत, एकमेकांना धक्काबुक्की करत परस्परांना पंजाबळाचे दर्शन घडवले. धक्कादायक म्हणजे हा वाद बोलण्यासाठी माईक मिळण्यावरुन झाल्याचे समजते. इतकेच नव्हे तर या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यासारखे राज्यातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी भर बैटकीत राडा केला. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूर शहर काँग्रेसने आयोजित केलेली ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती. मात्र, चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी भलत्याच मुद्द्यावरुन प्रकरण तापले आणि ते गुद्द्यांवर आले. त्यातच ज्येष्ठ नेत्यांसमोरच हा प्रकार घडल्याने काँग्रेसची नाचक्की झाली आहे. तसेच, पक्षांतर्गत मतभेद किती टोकाचे आहेत हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी देशातील एकमेव असलेला विरोधी पक्षातील मोठा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस जर अशा पद्धतीने वर्तन करत असेल तर त्यातून संदेश काय द्यायचा? असा सवाल आता काँग्रेसमधीलच कार्यकर्ते विचारु लागले आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल नुकतेच एक विधान केले होते. त्यामुळेही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. राहुल गांधी हे चांगले शिक्षित आहेत. उच्चविद्याविभूषित आहेत. मात्र, ते चांगले वक्ता नाहीत. त्यांना आपले मुद्दे आक्रमकपणे मांडता येत नाही, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आगोदरच नाराज आहेत. त्यातच वडेट्टीवार यांनी या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे तुम्ही येथे आलातच कसे काय? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या या वर्तनातुनही त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. दरम्यान, बैठक सुरु झाल्यानंतर माईक मिळण्यावरुनच दोन नेते परस्परांमध्ये भिडले आणि वाद सुरु झाला. या वादाचे पर्यावसन कार्यकर्त्यांमधील मोठ्या राड्यात झाले. त्यानंतर उपस्थित नेत्यांनी मध्यस्थी करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ
VIDEO : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा#Nagpur #Congress #Nanapatole pic.twitter.com/JzvZaVQsZ0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 12, 2023
राहुल गांधी यांनी काढलेल्या 'भारत जोडो' यात्रेनंतर काँग्रेस पक्षात काहीसे प्राण फुंकले गेले आहेत. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीमुळेही काँग्रेस अधिक जीवंत झाली आहे. सन 2014 नंतर सूर हरवलेल्या काँग्रेसला हळूहळू सुर गवसू लागला असून ती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र होते. राष्ट्रीय पातळीवरुन ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेस चांगली कामगिरी करु लागल्याचे चित्र सबंध देशभरात पाहायला मिळत आहे. परिमामी काँग्रेसने कर्नाटक राज्यात सत्तांतर केले. निवडणुका जाहीर झालेल्या पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि आणखी एखाद्या राज्यात काँग्रेस मुसंडी मारु शकते असेही चित्र आहे. दरम्यान, नागपूर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या वर्तनामुळे मुद्द्यांवर आलेली काँग्रेसची चर्चा भलतीकडेच वळल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.