Nagpur Municipal Corporation Elections: काँग्रेसच्या हाताला घड्याळाचे आव्हान; नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

नागपूर महापालिका निवडणूक (Nagpur Municipal Corporation Elections) जाहीर व्हायला अद्याप बराच काळ बाकी आहे. असे असले तरी राजकीय पक्ष मात्र आतापासूनच इलेक्शन मोडमध्ये गेले आहेत. नागपूर महापालिका निवडणुकीवरुन काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार खेचाखेची सुरु आहे.नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी काँग्रेसला इशारा देताना म्हटले आहे की, जर सन्मानजनक जागा दिल्या तरच आघाडीत लढू. अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. (हेही वाचा, Nagpur Municipal Corporation elections 2021: पदवीधर मतदारसंघात भाजप पराभूत, नागपूर महापालिका निवडणुकीत काय होणार?)

नागपूर महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, खासदर प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापासूनच प्रमुख कार्यकर्ते आणि अनेक छोटे-मोठे नेते यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

दरम्यान, गेली 58 वर्षे बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला. या पराभवामुळे भाजप चांगलाच गर्भगळीत झाला असून परवाभवाचे विश्लेषण केले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गडाला या निवडणुकीत थेट हादरा बसला. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये यासाठी भाजप आतापासूनच कामाला लागली आहे.भाजपची हालचाल पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवदीनेही मग आपला आळस झटकला आहे. सर्वजण चांगलेच कामाला लागले आहेत.