Nagpur Municipal Corporation elections 2021: पदवीधर मतदारसंघात भाजप पराभूत, नागपूर महापालिका निवडणुकीत काय होणार?
BJP | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकासआघाडीकडून भाजप (BJP) दणदणीत पराभूत झाला. खास करुन नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency) झालेला पराभव भाजपसाठी अतिशय चिंताजनक आहे. या पराभवाने पक्ष कार्यकर्त्यांसह नेतृत्वालाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता सव्वा वर्षानंतर होणाऱ्या नागपूर महापालीका निवडणूक 2021 (Nagpur Municipal Corporation Elections 2021) मध्ये भाजप काय आणि कशी रणनिती आखणार याबाबत उत्सुकता आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर निर्माण झालेल्या वातावरणात भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात विद्यमान महापौर, विधानपरिषद निवडणुकीत नुकतेच पराभूत झालेल्या संदीप जोशी यांनी पालिका राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा या आधीच केली आहे. दुसऱ्या बाजूला महापालिकेतील चर्चित चेहरा प्रवीण दटके यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून पक्षाने बडती दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे पालिकेत आणि पक्षासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करुनही पदाच्या अपेक्षेत असलेल्या नेते, कार्यकर्त्यांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची रणनीती अयशस्वी; विधान परिषद निवडणुकीत भाजप सपाटून पराभूत, काय आहेत कारणं?)

पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव हा तसा राजकीय वर्तुळातही आश्चर्याचा विषय. कारण गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून भाजप उमेदवारच निवडूण येत आहे. अशा स्थितीत पराभव होणे हे भाजपच्या गोटात सुतकी वातावरण निर्माण करणारे आहे. असे असले तरीही नागपूर भाजपमधील स्थानिक आणि दुसऱ्या फळीतील नेते मोठ्या आशेने कामाला लागले आहेत. नेहमीप्रमाणे या वेळी संदीप जोशी आणि प्रविण दटके हे महापालिका निवडणुकीच्या शर्यतीत नसल्यामुळे अनेक नगरसेवक आपापल्या वॉर्ड समितीचे अंदाज घेत काम करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.

दरम्यान, नागपूर भाजपमध्येही आता दोन गट पडले आहेत. या पक्षातही गटातटाचे राजकारण सुरु झाल्याचे पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळाले. परिणमी भाजपचा पराभव झाला. अशा स्थितीत या गटातटात आगामी काळात दिलजमाई होणार आणि महापालिका निवडणुकीत हे गट एकत्र काम करणार की पुन्हा एकदा पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवण्याचे काम होणार? याबाबत उत्सुकता आहे. ही उत्सुकता संपण्यासाठी आणखी सव्वा वर्ष वाट पाहावी लागणार आहे.