
माजी खासदार आणि सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांना नुकतेच काँग्रेस पक्ष सचिव पदावरून पायउतार व्हावे लागले. पक्षात निष्क्रिय राहिल्याने पक्षाने प्रिया दत्त यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आता आणखी एक झटका प्रिया दत्त यांना मिळण्याची शक्यता आहे, कारण आता मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये प्रिया दत्त यांच्या ऐवजी अभिनेत्री नगमा यांना काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगमा यांनी पक्षासाठी उत्तर प्रदेशपासून राजस्थान तेच कर्नाटकातही रोड शो केले आहेत.
रविवारी झालेल्या कॉंग्रेसच्या मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातील पक्षाच्या बैठकीत नगमा उपस्थित राहिल्याने याला दुजोरा मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातूनही नगमा यांनी उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी शक्यता एका काँग्रेस कार्यकर्त्यांने वर्तवली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत निवडणूक लढवत असत. त्यांच्या निधनामुळे आता या मतदारसंघातून नगमा यांना उमेदवारी देता येऊ शकेल.
प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. सुनील दत्त यांच्या निधनानंतर 2005 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र 2014 साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभावापासून प्रिया दत्त या गायब झाल्याचा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभाग न घेणे, काँग्रेसने भारत बंदची हाक दिली असतानाही प्रिया यांचे बाहेरगावी जाणे यामुळे पक्षाचे नेतेही त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना सचिवपदावरुन हटवण्यात आले आहे.
नगमा यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की पक्षप्रमुखच योग्य तो निर्णय घेतील, आणि जो निर्णय घेतली तो मला मान्य असेल.