Murlidhar Shingote Passes Away: पुण्य नगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन
Murlidhar Shingote

पुण्य नगरी वृत्तपत्र समूहाचे (Punyanagari Newspaper Group) संस्थापक मुरलीधर शिंगोटे (Murlidhar Shingote) यांचे निधन झाले आहे. ते बाबा शिंगोटे (Baba Shingote) या नावानेही परिचीत होते. गुरुवारी (6 ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील गायमुख वाडी, तालुका जुन्नर येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. अत्यल्प शिक्षण आणि पत्रकारितेची कोणतेही पार्श्वभूमी नसताना केवळ वृत्तपत्र वितरण व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर शिंगोटे यांनी वृत्तपत्र ((Punyanagari Newspaper) काढण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी करुन दाखवले. त्यांनी अल्पावधीत स्वतंत्र वृत्तपत्र समुह सुरु केला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन गुरुवारी 5.30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या उंब्रज या गावी 7 मार्च 1938 या दिवशी शिंगोटे यांचा जन्म झाला. त्यांनी शाळेत प्रवेश केला. मात्र, शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी इयत्ता चौथीमधूनच शिक्षण सोडून दिले आणि नशिब काढण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत सुरुवातीला त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरु केला. या काळात त्यांनी बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाच्या कामाला सुरुवात केली. ते घरोघरी जाऊन वृत्तपत्र टाकत असत. (हेही वाचा, मुंबई: ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन; मराठी पत्रकारितेचा खांब कोसळल्याची भावना)

दरम्यानच्या काळात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन टीपेला पोहोचले होते. याच काळात ते वृत्तपत्रांकडे अधिक आकृष्ट झाले. सर्वसामान्यांना आपले वाटेल, त्यातील भाषा साधी सोपी असेल असे वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न घेऊन ते कामाला लागले. अखेर प्रदीर्घ काळानंतर म्हणजे 1994 मध्ये त्यांनी प्रथम मुंबई चौफेर नावाचे एक सायंदैनिक सुरु केले. या दैनिकाचा जम बसवत त्यांनी पुढे आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता आदी दैनिकेही सुरु केली. शिंगोटे यांनी पुढे 1999 मध्ये दै. पुण्य नगरी हे दैनिक सुरु केले. सध्या हे दैनिक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात वितरीत होते आणि प्रसिद्धही होते. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.