Eknath Shine: 1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची गरज नाही- एकनाथ शिंदे
Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत (1500 Square Feet) घर बांधण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. त्यामुळे सध्या घर बांधण्याचा विचार करणाऱ्या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे. एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महत्वाचे म्हणजे, 31 डिसेंबर 2020 पर्यंतची सर्व बांधकामं नियमित होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

भविष्यातील महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांनी औरंगाबादचे दौरे केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद दौरा केला आहे. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर त्यानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, "31 डिसेंबर 2020 पर्यंतची सर्व बांधकामं नियमित होतील. त्याचबरोबर येथून पुढे जर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचे असले तर, महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही." राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Ramdas Athawale On Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, पूजा चव्हाणची आत्महत्या ही दुर्देवी आहे. मात्र, त्या घटनेशी मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडणे योग्य होणार नाही. यासर्व प्रकरणात माहिती घेतल्यानंतरच बोलणे उचित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.