Municipal Corporation Election 2018: आज अहमदनगर आणि धुळ्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडण्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे.
धुळ्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञान इसमांनी दुचाकीवरुन येत गोटे यांच्या गाडीवर दगडफेक केली. यामुळे गाडीची पुढील काच फुटली असून गोटे गाडीमध्ये नसल्याचे बचावले आहेत. यावेळी धावपळ झाल्याने अनिल गोटे यांना दम्याच्या त्रास सुरू झाला आणि त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाजपच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असून याविरोधात गुन्हा दाखल न करण्याचा पवित्रा गोटेंनी घेतला आहे. कारण भाजपने पोलिसांनाही मॅनेज केल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला आहे.
धुळ्यात महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी 74 जागांसाठी 355 उमेदवार मैदानात उतरले आहेत. यात काँग्रेस आघाडीचे 74, भाजपचे 62, शिवसेनेचे 50, लोकसंग्राम पक्षाचे 60, रासपचे 12, एमआयएमएचे 12 आणि समाजवादी पार्टीचे 12 उमेदवार आहेत. शहारात एकूण 3 लाख 29 हजार 569 मतदार मतदानाचा अधिकार बजावतील.
अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून यात 351 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. शहरात एकूण 2 लाख 56 हजार मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. यासाठी एकूण 337 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबतआघाडी करत एकत्रित निवडणूक लढवत आहे. तर शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.
अहमदनगर येथे मतदानापूर्वी शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागर थोरातवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्याकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. हल्ल्यामुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.