
मुंबई (Mumbai) मधील विक्रोळी रेल्वे स्टेशन (Vikhroli Railway Station) येथे धावत्या ट्रेनसमोर येऊन एका 27 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सेल्फी (Selfie) वरुन पतीसोबत वाद झाल्याच्या दोन दिवसानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, मृत महिलेच्या वडीलांनी या संबंधित पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणी मृत महिलेचा पती आणि तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिला एका खाजगी कंपनीमध्ये एचआर एक्स्झिक्युटीव्हचे काम करत होती. पती-पत्नीमधील भांडणानंतर पतीने तिला मारहाण केल्याचे तसंच तिच्या बालिश वागण्यासुद्धा तिच्या सासरच्यांकडून तिला त्रास सहन करावा लागत असल्याचे मृत महिलेच्या वडीलांनी सांगितले आहे. (औरंगाबाद: कौटुंबिक वादातून महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या)
5 मे रोजी मृत महिलेच्या पतीने तिच्या वडीलांना घरी बोलावून घेतले आणि तिने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत काढलेला सेल्फी दाखवला. यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाले आणि हे प्रकरण विक्रोळी पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले. पोलिस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यांनी सर्वांची समजूत घालून महिलेच्या वडीलांना तिला काही दिवसांसाठी माहेरी नेण्याचा सल्ला दिला. (धक्कादायक! कुटूंबातील आजारपणाला कंटाळून एका तरुणीने आई आणि कोमात असलेल्या भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, त्यानंतर केली आत्महत्या)
7 मे रोजी नोकरीसाठी माहेरीहून निघालेल्या महिलेने विक्रोळी स्टेशनवर धावत्या ट्रेनखाली आपला जीव दिला. त्यापूर्वी तिने आपल्या भावाला आणि वडीलांना टेक्स्ट मेसेज केला. दरम्यान, याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असून मृत महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.