Sexual Assault | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault Case) केलेप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 24 वर्षीय महिलेस अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाने आपली 17 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. दरम्यान, पोलिसांनी विरार येथील रिसॉर्टमध्ये शोध घेतला असता पीडित मुलगी तिथे असहाय अवस्थेत आढळून आली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले आणि तिला अटक केली आणि तिच्यावर पॉक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हाही दाखल केला. पोलीस तपासात पीडितेचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचर झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता, कुटुंबाने दाखल केली तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहणारी 17 वर्षीय मुलगी 7 जानेवारी रोजी कॉलेजला निघाली होती पण ती कधीही घरी परतली नाही. त्याच दिवशी नंतर, तिच्या आईला मुलीकडून एक संदेश मिळाला, ज्यामध्ये ती स्वेच्छेने निघून गेली आहे आणि तिच्या कुटुंबाने काळजी करू नये असे म्हटले होते. तथापि, तिचा फोन बंद असताना आणि ती सापडत नसल्याने कुटुंबाने पोलिसांकडे तिचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. (हेही वाचा, Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक)

सोशल मीडिया आणि तांत्रिक ट्रॅकिंगमुळे आरोपस पकडण्यात यश

अल्पवयीन मुलगी नेमकी गेली तरी कुठे? याबाबत पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली. दरम्यान, पीडितेच्या काकूनेही सदर मुलगी बेपत्ता झाल्याची पोस्ट तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली. दरम्यान, सदर मुलीने (पीडिता) ती सुरक्षीत असल्याची प्रतिक्रिया त्याच पोस्टखाली कमेंट बॉक्समध्ये दिली. त्यामुळे पोलिसांना 24 वर्षीय संशयीत महिलेबाबत पहिल्यांदा माहिती मिळाली. (हेही वाचा, Pusad Child Sexual Abuse: नातीचा लैंगिक छळ, बोंबले आजोबास POCSO कायद्याखाली 20 वर्षांची सक्त मजुरी)

तपास आणि घनाक्रम

दरम्यान,  मुंबई पोलीसांनी केलेल्या तपासात आढळून आले की, आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी विरारमधील एका हॉटेलशी संपर्क साधला होता. त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर पोलिसांना कळले की दोन तरुणींनी चेक इन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना खोली नाकारण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची उपस्थिती पुष्टी झाली आणि नंतर एका ऑटोरिक्षा चालकाने त्यांना बस डेपोजवळ सोडल्याचे सांगितले.

आरोपींनी ओळख पटू नये म्हणून नवीन सिम कार्ड खरेदी केल्याचा संशय आल्याने, अधिकाऱ्यांनी स्थानिक विक्रेत्यांची चौकशी केली आणि तिचा नवीन फोन नंबर मिळवला. या यशामुळे विरारमधील एका रिसॉर्टमध्ये दोघांचे ठिकाण शोधण्यास मदत झाली. तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना अल्पवयीन पीडिता आणि संशयित महिला अशा दोघीही आढळून आल्या.

पोक्सो कायद्यांतर्गत अटक, पीडिता बालसुधारगृहात

टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, विरार रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर, पोलिसांना अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दोघेही एकत्र सापडले. रिसॉर्टमध्ये रुम बुक करताना सुरुवातीला त्यांनी त्या परीक्षेसाठी येणाऱ्या बहिणी असल्याचा दावा केला होता. तथापी, चौकशीनंतर, महिलेला अटक करण्यात आली आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलमांखाली बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला, तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींसह तिच्यावर आरोप ठेवण्यात आले. दुसऱ्या बाजूला, प्रकरणाचा तपास सुरुच असताना अल्पवयीन मुलीने घरी परतण्यास नकार दिला, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी तिला बालसुधारगृहात पाठवले. दरम्यान, आरोपीला भायखळा महिला तुरुंगात हलवण्यापूर्वी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. तिच्या जामिनावर सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे.