Coronavirus: कोरोना विषाणूमुळे एकाच पोलीस कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्यते वाढ होऊ लागली आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच एकाच पोलीस कुटंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) कर्मचारी सोहेल शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

वडाळा टी टी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले सोहेल शेख यांना 40 दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनावरील उपचार घेण्यासाठी त्यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सोहेल शेख यांची आई आणि बहीण या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान प्रकृती अधिकच खालावत गेल्याने जून महिन्यात शेख यांची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यांनंतर सोहेल शेख यांच्या प्रकती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना गुरू नानक रूग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचीही तब्येत बिघडत गेली. दरम्यान, कोरोनाशी झुंज देत असताना आज अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल 8,232 पोलिसांना Covid-19 ची लागण तर 93 जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 8232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 861 पोलीस अधिकारी तर 7371 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 अधिकारी आणि 86 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोनातून 6314 पोलीस बरे झाले आहेत. यामध्ये 640 अधिकारी आणि 5674 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 1825 पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत. यामध्ये 214 अधिकारी 1611 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.