Mumbai: लोकल प्रवासाची मुभा नसल्याने दहावीच्या शिक्षकांनी छेडले 'विनातिकीट प्रवास' आंदोलन
Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) उपगनरामधील दहावीच्या शिक्षकांनी (SSC Teachers) 'विनातिकीट प्रवास' आंदोलन छेडले. कोविड-19 निर्बंधांमुळे (Covid-19 Restrictions) सध्या अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकलने (Local) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र दहावीच्या अंतर्गत मुल्यांकनासाठी शिक्षकांना शाळेत जावे लागत आहे. परंतु, लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने मुंबई आणि परिसरातील दहावीच्या शिक्षकांना शाळेपर्यंत प्रवास करणे अवघड जात आहे. यात ठाणे (Thane), डोंबिवली (Dombivali), कल्याण (Kalyan), वसई (Vasai), विरार (Virar), पालघर (Palghar), नवी मुंबई (Navi Mumbai) येथील शिक्षकांचा समावेश आहे. (शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला यंदाच्या 10वीच्या परीक्षा निकालाचा फॉर्म्युला; 11वी प्रवेशासाठी द्यावी लागणार वैकल्पिक सीईटी)

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रेल्वे तिकीट कॉऊन्टरवर तिकीट मिळत नसल्याने शाळेपर्यंत जाण्यासाठी शिक्षकांना बस, टॅक्सीचा पर्यायी मार्ग निवडावा लागत आहे. मात्र दररोज इतक्या लांबचा प्रवास बस किंवा टॅक्सीने करणे शक्य नसल्याने काही शिक्षकांनी ‘ticketless travel’ आंदोलन केले. यामध्ये त्यांनी विनातिकीट लोकल प्रवास केला आणि त्यानंतर तिकीट निरीक्षकाकडे जाऊन त्यासाठी दंड भरला. 200 पेक्षा अधिक शिक्षकांनी रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर फलक धरुन आंदोलन केले.

दरम्यान, 10 वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यासाठी 20 जून पर्यंत गुणतालिका तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रत्येक शाळेतील कमिटीकडून त्या गुणतालिका पुन्हा तपासण्यात येईल आणि 30 जून पर्यंत एसएससी बोर्डाकडे पाठवणे गरजेचे आहे. ही सर्व प्रक्रीया वेळेत झाल्यानंतरच जुलैच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करणे शक्य होईल.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सचिव शिवनाथ दरावडे यांनी सांगितले की, "8-10 तास प्रवासात गेल्यास शिक्षक मुल्यांकनाचे काम वेळेत पूर्ण करु शकणार नाहीत. शिक्षकांना 2 महिन्याचा पगार न देऊनही ते विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी ते मुल्यांकनाचे काम करत आहेत. मात्र बस आणि टॅक्सीने प्रवास करणे शक्य होणार नाही."