
भारताला नुकतीच चौथी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) मिळाली. ही वंदे भारत ट्रेन दिल्ली ते उना येथील अंब अंदौरा रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घोषणा केली की, मुंबई-सोलापूर (Mumbai-Solapur) मार्गावर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल.
फडणवीस म्हणाले की, भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत. त्या उच्च गती प्राप्त करू शकतात आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ 25% ते 45% कमी होतो. (हेही वाचा: दिवाळीनिमित्त मुंबई, उपनगरे आणि नवी मुंबईत बेस्ट चालवणार जादा बसेस, जाणून घ्या सविस्तर)
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची 45 एकर जमीन संपादित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भूविकास प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात झालेल्या ‘निश्चित करारावर’ स्वाक्षरी केल्यानंतर फडणवीस दिल्लीत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावरही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरील चर्चेदरम्यान रेल्वे कम रोड प्रकल्पाचा प्रस्ताव चर्चेसाठी आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेईल. यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी 487 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी फडणवीस यांना आज दिली. या पुनर्विकासामुळे प्रवाशांना नागपूर रेल्वे स्थानकावर जागतिक दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.