BEST Bus (Photo Credits: PTI)

मुंबईकरांच्या (Mumbai) सोयीसाठी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने दिवाळीनिमित्त (Diwali 2022) मुंबई, उपनगरे आणि नवी मुंबईतील प्रमुख मार्गांवर जादा बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान या जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. या बसेस दादर प्लाझा, काळबा देवी, वांद्रे, मुंबईतील महात्मा फुले मार्केट आणि नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असा दावा बेस्टच्या अधिकाऱ्याने केला आहे.

शहरातील विविध मार्गांना जोडणाऱ्या 25 विशेष बस सेवांमध्ये नवीन बस सेवा जोडल्या जातील. यासह 26 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आणि भाऊबीज निमित्त 140 जादा बस सेवांचेही नियोजन करण्यात आले आहे. या बससेवा संपूर्ण शहरात धावणार आहेत.

अतिरिक्त बस सेवेबाबत बेस्टने म्हटले आहे, ’दीपावलीच्या निमित्ताने मुंबईतील वीर कोतवाल उद्यान (प्लाझा-दादर), वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट (वाशी) यासारख्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोक गर्दीने जात असतात. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्यावतीने रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022 ते शनिवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विविध बसमार्गावर 25 अतिरिक्त बसफे-या चालविण्यात येणार आहेत.’

पुढे म्हटले, ‘त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी भाऊबीज आणि बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) हे दोन्ही दिवस एकत्रित येत आहेत. या दिवशी संपूर्ण मुंबई शहरात विशेषतः पूर्व-पश्चिम या दोन्ही भागात, पश्चिम द्रुतगती महामार्ग, भाईंदर तसेच नवी मुंबईकडे जाणा-या बसमार्गांवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने 140 अतिरिक्त बससेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी प्रवाशांनी या बससेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.’ (हेही वाचा: महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी मिळणार यंदाच्या महिन्याचा पगार; अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आदेश)

दरम्यान, याआधी महर्षी कर्वे रोड, तारदेव मार्गे गेट वे ऑफ इंडिया आणि जुहू बीच या शहराच्या महत्वाच्या मार्गांवर गरबा आणि देवी दर्शनासाठी रात्रीच्या वेळी सुरळीत प्रवास करण्यासाठी बेस्टने ओपन-डेक हॉप-ऑन-हॉप-ऑफ बस सेवा जाहीर केली होती. याशिवाय एसी बसेसचा दुसरा मार्ग जुहू बीच ते गोराई डेपो दरम्यान जुहू बस स्थानक, मिठीबाई कॉलेज, जेव्हीपीडी न्यू लिंक रोड, मिठचौकी, ओरियम चर्च, एसव्ही रोड, बोरीवली स्टेशन आणि गोराई डेपो दरम्यान चालवण्यात आला होता.