Mumbai Rains Local | (Photo Credit: Twitter)

 

 

Mumbai Rains Updates: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी (1 जुलै) मुसळधार पावसाने मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांना चांगलेच झोडपून काढले. दिवसभर संततधार कोसळत असलेल्या पावसाने मुंबईकरांना यंदा पहिल्यांदाच मुसळधार शब्दाची प्रचिती आणून दिली. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. तर रेल्वेसेवा पुरती कोलमडून गेली. मुंबई रेल्वेच्या मध्य (Central Railway) , पश्चिम आणि हार्बर (Harbour Railway) अशा तिन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली. ही वाहतूक सध्या सुरु असली तरी अद्यापही पुरती रुळावर आली नाही. तिन्ही मार्गावरील रेल्वे लोकल्स सुमारे 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. आज (सोमवार) दिवसभरातच मुंबई रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले राहिले. त्यामुळे दिवसभरात लोकलच्या तब्बल १८३ फेऱ्या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या.

पश्चिम रेल्वे

प्राप्त माहितीनुसार मुंबईवर पाऊस धो धो कोसळत असताना मरिन लाइन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. परिणामी या मार्गावरील लोकलच्या १०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेची अवस्थाही काही वेगळी नव्हती. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावरच पाणी तुंबले. त्यामुळे लोकलसेवा ठप्प झाली. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा मंदावला. त्यामुळे मध्य रेल्वे सुरु होऊ शकली. परंतु, रेल्वेचे वेळापत्रक मात्र दिवसभर पूर्ववत होऊ शकलं नाही. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या ५२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. या मार्गावर अद्यापही लोकल उशिरानेच धावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. (हेही वाचा, राज्यात काही ठिकाणी मान्सून दमदार, मुंबई-ठाणे शहरात कोसळधार; अतिवृष्टीचा इशारा)

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावरही वाहतूक कोलमडून गेली. वडाळा स्टेशनवर रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली. या मार्गावर लोकलच्या ३१ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दुपारनंतर वडाळा रेल्वे स्टेशनवरील पाणी ओसरले मात्र गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेच. अद्यापही या मार्गावरुन रेल्वे उशिराच धावत आहेत.