एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मुंबई (Mumbai) शहरातील काही भागांत पावसाच्या संततधारासह मध्यम ते जोरदार पाऊस (Mumbai Rains) झाला. आता भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबईच्या प्रादेशिक केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, ज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या मंगळवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवर सामान्यपणे धावत होत्या. मात्र, काही प्रवाशांनी रेल्वे सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा केला.
पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवरील वाहनांची हालचाल मंदावली, परंतु एकूणच कुठेही मोठी वाहतूक कोंडी झाली नाही. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सायन, माटुंगा कुर्ला, चेंबूर, अंधेरी आणि परळसह शहर आणि उपनगरांच्या बहुतांश भागात सोमवारी रात्रीपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या (BEST) एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांची बस सेवा देखील सामान्य होती.
(हेही वाचा: Mumbai Dengue Cases: मुंबईकरांनो काळजी घ्या; शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल नऊ पटीने वाढ- BMC Report)
एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत अनुक्रमे 33 मिमी, 13.21 मिमी आणि 18.62 मिमी सरासरी पाऊस पडला. आता प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे त्यात म्हटले आहे. याशिवाय, गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.