पीडित महिला (File Photo)

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे लोकल कधीतरी लोकांच्या जीवावरही उठते. चालत्या लोकलमधून एक प्रेग्नेंट महिला खाली पडली आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकात 26 सप्टेंबरला सकाळी 10:30 च्या सुमारास ही घटना घडली. पूजा जगताप असे या महिलेचे नाव आहे.

सदर घटना पाहताच महिला पोलीस शिपाई रुपाली मेजारी या ट्रेनमधून उतरल्या आणि धावत पटरी जवळ पोहचल्या. महिलेल्या उचलून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित महिला पूजा चार महिन्यांची गरोदर असून तिची प्रकृती सुधारत आहे. गर्भातील बाळ सुरक्षित असल्याचा हवाला डॉक्टरांनी दिला आहे.

''सहा महिन्यांपूर्वी आमचे लग्न झाले असून आम्ही आमचे नव्या कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक होतो, ''असे पीडित महिलेचा पती स्वप्निल याने सांगितले. पुढे तो म्हणाला की, "माझी पत्नी पूजा माहिमच्या ड्रेस डिझाईनिंग ऑफिसमध्ये काम करते. आम्ही गोरेगावला राहत असल्याने ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी ट्रेनचा पर्याय तिच्यासाठी योग्य होता."

या सर्व दुर्घटनेत मदतीला धावून आलेल्या पोलीस महिला शिपाई मेजारी यांनी सांगितले की, "पूजा जगताप पडल्या तेव्हा मी लोकलच्या दुसऱ्या डब्यात होते. मी त्यांना पडताना पाहिले पण चालत्या ट्रेनमधून उडी मारणे शक्य झाले नाही. मग ट्रेन वांद्रे स्टेशनला येताच मी ट्रॅकच्या दिशेने धावले. माझ्यासोबत कॉलेजची एक मुलगी प्रेरणा शहा देखील होती. तिने देखील जगताप यांना पडताना पाहिले होते. ती ट्रॅकवर पडली असल्याने केव्हाही तिथे दुसरी ट्रेन आली असती. म्हणून आम्ही दोघींनी तिला उचलून वांद्रे स्टेशन पोलिसांच्या ताब्यात दिले."