Mumbai Police: परमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्यांच्या तपासासाठी SIT स्थापन-  मुंबई पोलीस
Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपास आता विशेष तपास पथक (SIT) करणार आहे. परम बीर सिंह यांच्यासह इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एसआटीची (SIT) स्थापना केली आहे. परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. श्यामसुंदर अग्रवाल नामक व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. श्याम सुंदर अग्रवाल हे भाईंदर येथील विकासक (बिल्डर) आहेत.

दरम्यान, श्याम सुंदर अग्रवाल यांच्यावरही मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल आहे. संघटीत गुन्हेगारी विरोधात म्हणजेच मोक्का अंतर्गत गुन्हा अग्रवाल यांच्यावर दाखल आहे. या गुन्ह्याची चौकशीही एसआयटीद्वारे करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Parambir Singh Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा, दोघांना अटक)

परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल आहे. शरद अग्रवाल नामक व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरु पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतही परमबीर सिंह यांच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. जमीन बळजबरीने नावावर केल्याचा आरोपीही या तक्रारीत करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात परमबीर सिंह मुख्य तर संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे हे सहआरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे यांच्याकडे आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक आरोप करुन परमबिर सिंह चर्चेत आले होते.आता परमबिर सिंह यांच्याविरुद्धच खंडणीचा गुन्हा (Case Of Extortion Registered) दाखल झाला आहे, त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते याबाबत उत्सुकता वाढली आहे.