Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक आरोप करुन चर्चेत आलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या विरुद्धच आता खंडणीचा गुन्हा (Case Of Extortion Registered) दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. एका व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police Station) हा गुन्हा दाखल केला आहे. सचिन वाझे (Sachi Waze) याच्या मार्फत अनिल देशमुख पैसे वसुली करत असल्याचा गंभीर आरोप एका पत्राद्वारे परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपाने राज्यात आणि पोलीस दलात जोरदार खळबळ माजली होती. या प्रकरणात अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

परमबीर सिंह यांच्याविरोधातील प्राप्त तक्रारींबाबत महाराष्ट्र सरकारने गेल्याच आठवड्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला (Anti Corruption Bureau) देण्यात आले. परमबीर सिंह आणि महाराष्ट्र पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा समावेश करुन घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh: धोका आहे!, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला जाणे टाळले, पत्र लिहून कळवले कारण)

एएनआय ट्विट

दरम्यान, परमबीर सिंह हे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्याही निशाण्यावर आले आहेत. एका प्रकरणात त्यांची इडीद्वारेही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात इडीने त्यांना समन्स बजावल्याचीही माहिती आहे. परमबीर सिंह यांच्यावर असाही आरोप आहे की, ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते तेव्हा ते मलबार हिल (Malabar Hill, Mumbai) परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहात होते. या अपार्टमेंटमधील घरभाडे त्यांनी थकवले आहे.