सक्तवसुली संचानलाय (Enforcement Directorate) हे सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी आज (मंगळवार, 29 जुन) बोलावले होते. दरम्यान, आपले वय, आजारपण आणि बाहेर असलेला कोरोनाचा धोका यामुळे आपण चौकशीसाठी येऊ शकत नाही. त्यामुळे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आपली चौकशी करावी, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख हे ईडीच्या रडारवर आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. या आरोपांची दखल घेऊन सक्तवसुली संचानलाय ही केंद्रीय यंत्रणा सक्रीय झाली आणि अनिल देशमुख यांच्या पाठिमागे चौकशीचा ससेमीरा लागला. सीबीआय, ईडी यांसारख्या तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी छापेमारी केली. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. आता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून आतापर्यंत दोन वेळा समन्स बजावण्यात आले आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh यांच्यावरील कारवाईवर Sanjay Raut यांची संतप्त प्रतिक्रिया)
अनिल देशमुख यांना ईडीने पहिले समन्स पाठवले तेव्हा त्यांनी आपल्या वकीलाकरवी मुदत वाढवून मागितली होती. त्यांनतर ईडीन दुसरे समन्स पाठवून अनिल देशमुख यांना चौकशीला बोलावले होते. या समन्सनुसार अनिल देशमुख यांची आज चौकशी होणार होती. दरम्यान, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोना आदींमुळे असलेल्या धोक्याचे कारण देिले आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आपली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.
माझे वय 72 वर्षे आहे. त्यामुळे आजारपण, वय आणि बाहेर असलेला कोरोनाचा धोका विचारात घेता आजही मी चौकशीला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे माझी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चौकशी करण्यात यावी, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. ऑनलाईन अथवा ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जबाब नोंदविण्यास मी केव्हाही तयार आहे. तसेच, ईडीच्या प्रश्नांना उत्तरे देणयासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.