दारुच्या व्यसनाला वैतागून एका पोलीस कर्मचाऱ्याची वडिलांनीच हत्या (Father Killed His Son) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) शहरामधील अंधेरी (Andheri) परिसरातील घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मृत हा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याला दारूचे व्यसन असल्याचे समजत आहे. त्यामुळे तो दारू पिऊन आल्यानंतर त्याचा कुटुंबियांना खूप त्रास द्यायचा. दररोज घरात होणाऱ्या वादाला कंटाळून मृताच्या वडिलांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे.
हरीश गुलाब गलांडे असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हरिश हा मुंबई येथील अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून तो आपली पत्नी, मुले आणि आईवडिलांसोबत पवई येथील पंचकुटीर येथील गणेश नगर येथे राहत होता. हरिशला दारूचे व्यसन होते. गेल्या काही वर्षापासून तो अडचणीत असल्यामुळे दारू प्यायचा अशीही माहिती समोर आली आहे. हरिश हा दारूच्या नशेत सतत आपल्या कुटुंबियांना त्रास द्यायचा. दररोज घरात होणऱ्या या वादाला गुलाब वैतागून गेले होते. सोमवारी रात्री पुन्हा हरिशने वाद घालायला सुरुवात केली. या वादातून हरिशने वडिलांच्या दिशेने काचेची बॉटल भिरकावली असता संतापलेल्या गुलाब यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, गुलाब यांनी आपल्याजवळ असलेला कोयता हरिशच्या डोक्यात घातला आणि सपासप वार केले. यात हरिशचा जागीच मृत्यू झाला. हे देखील वाचा- औरंगाबाद: मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून तरुणाच्या भावाची गळा चिरून हत्या; आरोपींच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
सध्या राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. नुकतीच औरंगाबादमध्येही आंतरजातीय वादातून एका तरूणाची हत्या करण्यात आली होती. आपल्या शेजारी राहणाऱ्या तरूणाच्या भावाने आपल्या मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून ही घटना घडली. सध्या मृताचा भाऊ आणि आरोपींची मुलगी दोघेही बेपत्ता असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे, अशी माहिती समोर आली आहे.