मुंबई: मालाड मध्ये मालवणी परिसरात दुमजली चाळीचा भाग कोसळला; बचावकार्य सुरू
Malvani Chawl Collapse | Photo Credits: Twitter/ BMC

मुंबई मध्ये मालाड (Malad) मध्ये मालवणी (Malwani) परिसरात एका दुमजली चाळीचा भाग कोसळला आहे. दरम्यान यामध्ये काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे. अशी माहिती मुंबई पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी 4 फायर इंजिन 1 रेस्क्यु व्हॅन आणि अ‍ॅब्युलन्स तैनात करण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास देण्यात आली त्यानंतर लगेचच सारी यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून बचाव कार्य सुरू आहे.

बीएमसीने ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, मातीच्या ढिगार्‍यातून 4 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 5-6 जण मातीच्या ढिगार्‍यामध्ये अडकले आहेत. दरम्यान जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. तर इतरांना शोधण्याचे काम सुरू आहे.

BMC Tweet

मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये मरीन लाईन्स, ग्रॅंट रोड या दोन ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या मुंबईमध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहील आणि पावसाला जोर कायम राहील अशी माहिती देण्यात आली आहे.