Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण साठा 100 टक्‍क्‍यांच्या जवळपास पोहोचला आहे. यामुळे शहरात 2023 मध्ये कोणतीही पाणीकपात (Water Cuts) होण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता आहे त्यामुळे आठवड्याच्या शेवटी सर्व तलावांमधील पाणीसाठा 100 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, सात तलावांना क्षमता पातळी गाठण्यासाठी 14.47 लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.

5 जुलै रोजी मुंबईच्या पूर्व उपनगरातील पवई तलाव, जिथून उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो, तो ओव्हरफ्लो झाला. यानंतर मोडकसागर, तानसा, तुळशी आणि विहार हे चार तलाव ओसंडून वाहू लागले. 13 जुलैला मोडकसागर तलाव, 16 जुलैला तुळशी आणि 11 ऑगस्टला विहार पूर्ण भरले. तानसा 14 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला आणि आता त्याच्या क्षमतेच्या 99.34 टक्के आहे. गेल्या वर्षी, यावेळी, तलावांमधील एकूण पाणीसाठा 13.98 लाख दशलक्ष लिटर किंवा 96.63 टक्के इतका होता.

भातसा येथून जास्तीत जास्त पाणीपुरवठा होतो, तर तुळशी आणि विहारमधून सुमारे 1 ते 2 टक्के पाणीपुरवठा होतो. मध्य वैतरणा 12 टक्के, मोडक सागर 11 टक्के, तानसा 10 टक्के आणि अप्पर वैतरणा 16 टक्के पाणी देते. बीएमसी शहराला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते. (हेही वाचा: पुण्यातील मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने बाबा भिडे पूल पाण्याखाली, पहा फोटोज)

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता आणि रहिवाशांना खबरदारीचे आवाहन केले आहे. मुंबईत 16 व 17 सप्टेंबरला मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.