मुंबई मेट्रो (Photo Credits: ANI)

मुंबईमध्ये सध्या अंधेरी ते घाटकोपर मार्गावर मेट्रो (Mumbai Metro) सुरू आहे, तर इतर फेजची निर्मिती अतिशय वेगात चालू आहे. अशात मेट्रो प्रवास सुकर आणि कॅशलेस (Cashless Travel) व्हावा म्हणून एक नामी उपाय शोधून काढला आहे. आता मेट्रोचे तिकीट हे डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांच्याद्वारे मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ‘इन्स्टामोजो’ (Instamojo) शी याबाबत टायअप करण्यात आले आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल.

जवळपास साडेचार लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. मासिक ट्रिप पास, स्टोअर व्हॅल्यू पास व स्कीप क्यू अशा सेवांसाठी सध्या मोबाईल तिकिटिंगचा वापर होत आहे. मात्र आता एकेरी-दुहेरी प्रवास अशा सर्व सुविधांसाठी प्रवासी डेबिट अथवा क्रेडीट कार्ड वापरू शकणार आहेत. यासाठी थेट तिकीट खिडक्यांवर स्टॅटिक क्यूआर कोड स्कॅन करून किंवा डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील देऊन तिकीट खरेदी करता येणार आहे. (हेही वाचा: Mumbai Metro चा मासिक पास महागला, तर स्मार्टकार्ड रिचार्जवर मिळणार कॅशबॅक)

यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवर नमूद केलेली लिंक त्यांच्याकडे सेव्ह करून ठेवल्यास, खिडक्यांवर येण्यापूर्वी किंवा आल्यावर त्यातून पैसे देऊ शकतात. तिकीट निश्चित झाल्याचा संदेश संबंधित खिडकीवर दाखवून त्यांना तिकीट घेता येणार आहे. दरम्यान मेट्रोचा एक महिन्याचा पास (MTP) 25 ते 50 रुपयांनी महागला आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. तसेच मेट्रोने प्रवाशांना कॅशबॅकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मासिक पास तुम्ही एसव्हीपी (SVP) ने रिचार्ज केल्यास तुम्हाला 2 ते 10 % कॅशबॅक मिळणार आहे.