Mumbai Metro: आज होणार मुंबईमधील मेट्रोच्या 2 नवीन मार्गांचे उद्घाटन; जाणून घ्या स्थानकांची नावे, दर आणि वेळा
मुंबई मेट्रो (Photo Credits: ANI)

मुंबईचा (Mumbai) पहिला पूर्व-पश्चिम मुंबई मेट्रो वन कॉरिडॉर सुरु झाल्यानंतर आठ वर्षांनी, महाराष्ट्राच्या राजधानीला आज आणखी दोन मेट्रो (Mumbai Metro) मार्ग मिळतील- मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्ग शनिवारी अंशतः सुरु होतील. मेट्रो 2A- दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर (अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो 7- दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वेपर्यंत, असे हे दोन मार्ग आहेत, ज्यामुळे उत्तर-पश्चिम उपनगरातील लोकांना खूप फायदा होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या मार्गांचे लोकार्पण करतील.

मेट्रो 7 ची लांबी 33.50 किमी आहे, ज्यामध्ये 29 स्थानके असतील (पूर्णपणे पूर्ण झाल्यावर) आणि मेट्रो 2A मार्गावर 17 स्थानके असून, हे अंतर 18 किमी आहे. हे दोन्ही मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्ग, पश्चिम रेल्वे उपनगरी विभाग, एसव्ही रोड आणि लिंक रोड यांना समांतर असतील. यामुळे लोकल गाड्यांमधील तसेच रस्त्यावरील गर्दी एक तृतीयांश पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. दोन्ही कॉरिडॉरवरून दररोज साधारण 10 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.

स्थानकांची यादी:

मेट्रो 7 वरील स्थानके- आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोयसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरीपाडा, दहिसर

मेट्रो 2A वरील स्थानके- धनुकरवाडी, कांदिवली, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, एकसर, मंडपेश्वर, खंडरपाडा, अप्पर दहिसर, दहिसर

मेट्रो प्रवास दर:

0-3 किमी- 10 रु

3-12 किमी- 20 रु

12-18 किमी- 30 रु

18-24 किमी 40 रु

24-30 किमी- 50 रु

वेळा:

मेट्रो पहाटे 5 वाजता सुरू होणार असून रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. मेट्रो ट्रेनमधील वारंवारता 10-11 मिनिटे असेल. मेट्रोला प्रत्येकी सहा डबे असतील. (हेही वाचा: 'मेट्रोची कामे आम्ही सुरू केली होती', भाजपचा शिवसेनेवर निशाणा; शहरात झळकले 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' चे बॅनर्स)

दरम्यान, पूर्ण मेट्रो-2A कॉरिडॉर दहिसर (पूर्व) ते डीएन नगर (अंधेरी पश्चिम) लिंक रोडवर, असा असेल. दुसरीकडे, मेट्रो-7 पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) पर्यंत धावणार आहे. हे दोन्ही मार्ग ऑक्टोबरमध्ये पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे मुंबईचे मेट्रो नेटवर्क सध्याच्या 12 किमीवरून 50 किलोमीटरपर्यंत वाढेल.