CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लोकल ट्रेन ही महानगराची जीवनवाहिनी आहे. दुसरीकडे मेट्रो (Mumbai Metro) सेवा शहरी वाहतुकीला नवा आयाम देत आहे. 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई मेट्रोच्या दोन नवीन मार्गांवर वाहतूक सेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाला हिरवा झेंडा दाखवतील. मुंबईतील पहिला मेट्रो रेल्वे मार्ग 8 वर्षांपूर्वी सुरू झाला होता, आता दुसरा रेल्वे मार्ग उद्यापासून सुरू होणार आहे. त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले. ‘मेट्रोची कामे आम्ही सुरू केली होती, ती आता या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाली आहेत. जनतेला सर्व काही माहित आहे.’

फडणवीस पुढे म्हणाले. ‘आम्ही ज्या पद्धतीने काम केले, तसेच काम या सरकारनेही केले, तर कारशेडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो आणि मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे रखडलेले कामही नऊ महिन्यांत सुरू होऊ शकते. अन्यथा पुढील 4 वर्षे ही मेट्रो मार्गिका सुरू होणार नाही.’

दुसरीकडे, उद्या होणाऱ्या मेट्रोच्या 2-ए आणि 7 या लाईन्सच्या लोकार्पण सोहळ्यास राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच देण्यात आलेले. राज्य सरकारच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचे नाव नसल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. वांद्रे शहरात भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून, 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' असे कॅप्शन दिले आहे. (हेही वाचा: 'गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज’ या वृत्तांचं CM Uddhav Thackeray यांच्या कडून खंडन)

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत, दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी आणि आरे ते दहिसर पूर्व असे हे दोन मार्ग आहेत. मात्र त्याआधीच भाजपने वांद्र्यात मोठमोठे होर्डिंग्ज लावून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबईतील 337 किमी मेट्रो प्रकल्पासाठी 1 लाख 40 हजार 433 कोटी मंजूर करण्यात आले होते. भाजपा सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो कामाला सुरूवात झाली. त्यामुळे उद्धाटन महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असले तरी त्याचे श्रेय भाजपाचेच आहे असा दावा या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आता यावर शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहावे लागेल.