प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) 43 वर्षीय कर्मचार्‍याचा शनिवारी पहाटे मध्य मुंबईतील परळ बस डेपोजवळ (Parel Bus Depot) मृतदेह आढळून आला आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी येथील रहिवासी असलेला मृत महेश लोले हा बस कंडक्टर म्हणून काम करत होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान महेश लोले याचा मृत्यू नैसर्गिकरित्याच झाल्याचं म्हटलं आहे.

90,000 पेक्षा पे रोलवर असलेले राज्य परिवहन संस्थेचे कर्मचारी नोव्हेंबर 2021 पासून संपावर आहेत. काल शुक्रवार (8 एप्रिल) MSRTC कामगारांच्या एका गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन केले. ज्येष्ठ नेते शरद पवार या प्रकरणी लक्ष देत नसल्याचं त्यांचं मत आहेत. हे देखील नक्की वाचा: MSRTC Employees Strike Update: मुंबई उच्च न्यायालयाकडून 22 एप्रिल पर्यंत कामावर रूजू होण्याचे कर्मचार्‍यांना आदेश .

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोले चार दिवसांपूर्वी मुंबईत आले होते, मात्र ते दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात गेले नाहीत. ज्या ठिकाणाहून मृतदेह सापडला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तो शुक्रवारी दादर परिसरात दिसल्याचे आढळून आल्याचं समोर आले आहे.

शनिवारी पहाटे हा मृतदेह सापडला असून या संदर्भात दादर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने PTI शी बोलताना सांगितले. "त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत, परंतु पोलिस पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहेत," अशीही माहिती त्यांनी दिली आहे. मृताच्या कुटुंबीयांना लोलेच्या मृत्यूची माहिती देण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.